मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आहे.
भाजपाने गेल्या काही महिन्यात चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले असल्याने नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा आहे. सोमवारी विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. “समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.
नितीन गडकरी यांनी यावेळी शरद जोशी यांचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांनी लिहिलं होतं जे राज्यात काम करत नाहीत, त्यांना दिल्लीत पाठवण्यात आलं. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं आणि जे तिथेही कामाचे नव्हते त्यांना राजदूत बनवण्यात आलं. भाजपाध्यक्ष असताना दु:खी नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला भेटली नाही असंही यावेळी ते म्हणाले.