नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळे उद्योगधंदे ठप्प होते. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. अशातच देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे.
अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं की, “देशात पैसे आणि अन्नाची काहीच कमतरता राहू नये, यासाठी आत्मनिर्भर भारताप्रमाणे सरकारने निश्चय केला होता. याच संबंधात अर्थमंत्री सीतारमण यांनी घोषणा केली होती की, ‘एक देश, एक बाजार’ च्या आधारावर ‘एक देश, एक रेशन कार्ड’ अशी मोहीम राबवली होती. सरकारने आधीच राज्यांकडून ‘एक देश, एक रेशन कार्ड’ लागू करण्यास सांगितलं होतं. आता १८ राज्यांमध्ये ही सुविधा लागू करण्यात आली आहे.’
दरम्यान, निर्मला सीतारमण आज इमर्जंन्सी क्रेडिटची सुविधा देण्याची घोषणा करू शकतात. देशभरात रेकॉर्डब्रेक जीएसटीचा परतावा झाला असल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “मूडीजने देशाच्या जीडीपीमध्ये सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे. आता मूडीजने देशाचा जीडीपी ८.९ टक्क्यांवर असल्याचं सांगितलं आहे.” पुढे बोलताना त्यांनी परदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली असल्याचं सांगितलं. यादरम्यान, त्यांनी सांगितलं की, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १० लाखांवरून कमी होऊन ४.८९ लाखांवर आली आहे. निर्मला सीतारमण यांनी बोलताना सांगितलं की, “आता देशातील बँकांची क्रेडीट ग्रोथही वाढत आहे.” अर्थमंत्र्यांसोबत या पत्रकार परिषदेत अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते.