सोलापूर (वृत्तसंस्था) घरातील सोने आणि पैसे चोरी केल्याची माहिती सासूला समजले होते. यामुळे सतत वाद होऊ लागल्यानंतर घरामध्ये घरात कोणी नसताना सासूचा सुनेने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. सासू निर्मला महादेव धनवे (वय ५५), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर कोमल अनिल धनवे (वय २१, रा. बगले चाळ, सोलापूर रोड, बार्शी), असे संशयित आरोपी सुनेचे नाव आहे. दरम्यान, सुनने घरातील दागिन्यांसह पैसे चोरी केले होते. हे लपवण्यासाठी सुनेने सासूचा काटा काढला. त्यानंतर सुनेने खुनाचा बनाव केल्याचे आता उघड झाले आहे.
सासू निर्मला महादेव धनवे (वय ५५) आणि सून कोमल अनिल धनवे यांचे घरगुती कारणावरून नेहमी वाद होत होते. पैसे व गंठन चोरीच्या कारणावरून आठ दिवसांपासून घरामध्ये भांडणे चालू होती. हा वाद आणखीन वाढल्यानंतर शनिवार दि. ८ एप्रिल रोजी घरात कोणी नसताना कोमल यांनी सासू निर्मला यांचा गळा आवळला. तसेच डोक्यात मारून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सासू निर्मला धनवे या घरामध्ये चालत असताना पडल्यामुळे जखमी होऊन मृत्यू झाल्याचा बनाव सून कोमल यांनी रचला होता. परंतू तपास करत असताना निर्मला यांचा गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. पोलिस तपासामध्ये सून कोमल हिने सासूचा खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड यांनी फिर्याद दिली आहे. तर पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.