जळगाव (प्रतिनिधी) जीएसटी विभागाचा निरीक्षक असल्याचे सांगत उद्योजकांना वेगवेगळी भीती दाखवत त्यांच्याकडे लाखो रुपयांची खंडणी मागणाऱ्या तोतया जीएसटी अधिकाऱ्याला शुक्रवारी पकडले. त्याची कसून चौकशी केली असता, तोतया अधिकारी भाऊसाहेब ठाकरे हा जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांच्या वाहनावर चालक होता. अधिकारी ज्या पद्धतीने राहत होते बोलत होते त्यांचे अनुकरण करुन तो उद्योजकांकडे जीएसटी अधिकारी म्हणून पोहचून त्यांच्याकडून पैशांची मागणी करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
नेमकं काय घडलं ?
गेल्या काही वर्षांपासून जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन उद्योजकांच्या कागदपत्रांची पाहणी करीत एक अधिकारी उद्योजकांना वारंवार त्रास देत होता. गेल्या दोन दिवसांपूर्वी हाच अधिकारी उद्योजक अशोक मुंदडा यांच्या कंपनीत येऊन कागदपत्रांची पाहणी केली. नाशिक येथील अधिकाऱ्याच्या नावाने त्याने मुंदडांकडे तडजोडीची मागणी करीत थेट ३० लाख रुपये मागितले. संशय आल्याने मुंदडा हे सावध झाले. तोच तोतया अधिकारी शुक्रवारी पुन्हा येणार असल्याने त्यांनी अन्य उद्योजकांना बोलवून ठेवले होते. शुक्रवारी हा तोतया महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली (एमएच १९, सीवाय ००२५) क्रमांकाची कार घेऊन कंपनीत पोहचला. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून देतो, असे सांगितले. त्यावेळी त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता तो ते दाखवू शकला नाही. त्यावेळी त्याची उलट तपासणी केली असता, तो माहिती देऊ न शकल्याने तो उद्योजकांच्या तावडीत सापडला आणि त्याचे पितळ उघडे पडले.
तोतयागिरी करणे पडले महागात !
जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईसाठी जाण्यासाठी खासगी वाहने भाडेतत्वार घेत असतात. त्याच वाहनांवर भाऊसाहेब ठाकरे हा चालक म्हणून नोकरी करीत होता. जीएसटीचे अधिकारी कुठे कुठे जातात, कोणाला भेटतात त्यांच्याकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते त्यांची माहिती घेण्यासह तपासणीची पद्धत कशी अशी संपूर्ण भाऊसाहेब ठाकरे याने हेरले.
त्यानंतर त्याने जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत तो तोतया गिरी करुन तो उद्योजकांकडे जाऊन त्यांना धमकावू लागला. परंतु शुक्रवारी त्याच्या तोतयागिरीचा भांडाफोड झाल्याने त्याला तोतयागिरी चांगलीच महागात पडली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
अनेक उद्योजकांकडे पैशांची मागणी !
उद्योजकांना भाऊसाहेब ठाकरे हा तोतया अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्याच्या मोबाईल व कारची तपासणी केली. यावेळी त्याच्या कारमध्ये अनेक कागदपत्रे सापडली. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात वेगवेगळ्या उद्योजकांकडे पैशांची मागणी केल्याचे चॅटमधून समोर आले आहे. उद्योजकांनी या तोतया अधिकाऱ्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जात आहे.