नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काँगेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे.
काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात येणार येईल आणि जानेवारीमध्ये काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळेल अशी शक्यता वर्तण्यात येत आहे. तसेच राहूल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती पक्की मानली जात आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत महाअघाडी करत 70 जागा लढवल्या होत्या. त्यात काँग्रेस पक्षाला 9 जागा जिंकता आल्या.
बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर काँग्रेसच्या विशेष समितीची एक बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनवण्यावर विचार विनिमय करण्यात आला. मात्र, सोनिया गांधी यांनी स्वत:ला या बैठकीपासून दूर ठेवलं. सोनिया गांधी या सध्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्या त्या आई आहेत. त्यामुळे त्यांनी या बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं. समितीवर कुठलाही दबाव पडू नये आणि समिती स्वतंत्रपणे पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा करेल, हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाच्या हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.