नाशिक (वृत्तसंस्था) दारू पिऊन आई-वडीलांसह कुटुंबियांना त्रास देत असल्याने वडिलांनीच पोटच्या एकुलत्या एका मुलाला मारण्यासाठी गावातल्याच दोघांना ७० हजारांची सुपारी देऊन खून केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. राहूल शिवाजी आव्हाड (वय ३०), असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास पास्ते ते हरसुल रस्त्यावर परिसरातील शंकर कातकाडे यांना बंद पडलेल्या कालिया कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहूलचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राहूलच्या तोंडातून फेस निघत असल्याने नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली. मात्र, राहुलने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला. याबाबत खुलासा होत नसल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले होते.
परंतू शवविच्छेदन अहवालात राहूलचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांकडून राहूलच्या कुटुंबातील सदस्यांना व ग्रामस्थांकडे राहुलबाबत चौकशी केली. यात पोलिसांना राहूल हा मद्याच्या आहारी गेल्याने आई-वडिलांना त्रास देत असल्याचे कळून आले. तसेच तो गावातील नागरिकांनाही त्रास देण्यासोबत आई-वडिलांनाही मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली.
यानंतर पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावल्याने राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड (वय ५०) यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड (वय ४०) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (वय ४३) या दोघांना ७० हजाराची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यानंतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्या वेळी राहूलला एकांतात गाठत त्यास हरसूले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहूलचा गळा दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कोठाळे करत हे आहेत.
राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता. परंतू शवविच्छेदन अहवालात राहूलचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर वसंत आणि विकास या दोघांनी राहुल तोंडात विषारी औषध टाकून त्यास कंपनीतील मीटर रूममध्ये टाकून दिल्याची दोघांनी कबूली दिली. संशयितांनी राहूलचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याच्या तोंडात विषारी औषधही टाकण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. सोमवारी शिवाजी आव्हाड यांनी वसंत आव्हाड याच्या बँक खात्यावर वीस हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले व पन्नास हजार रुपये रोख दिले होते.