जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील भागात झालेल्या खूनातील फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भल्या पहाटेच्या दरम्यान शिताफीने अटक केली आहे. नरेंद्र उर्फ भुऱ्या उर्फ भद्रा पंडीत सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याचा 20 डिसेंबरच्या सायंकाळी खून झाला होता. गुन्हा घडल्यापासून नरेंद्र उर्फ भु-या सोनवणे हा फरार होता. फरार नरेंद्र उर्फ भु-या हा पोलिसांच्या कारवाईच्या भितीने मोबाईल वापरत नव्हता. आपले लोकेशन कुणाला समजू नये याची तो काळजी घेत होता. तरी देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुऱ्याला ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले आहे. भुऱ्याला मुळगावी आसोदा येथून अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि. किसनराव नजनपाटील यांना भु-या हा आसोदा येथे आला असल्याची समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, सचिन महाजन आदींना रवाना केले होते. या पथकाने भु-याला शिताफीने अटक केली. यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.