चोपडा (प्रतिनिधी) कोरोना विषाणूमुळे वाढती रुग्ण संख्या पाहता चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची १०० बेडची क्षमता असूनही क्षमतेपेक्षा दुप्पट कोविड रुग्ण यात उपचार घेत आहेत.
गोरगरिबांना तसेच मध्यवर्गीयांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी अनेक जण उपजिल्हा रुग्णालयांचा रस्ता धरतात. प्रत्येक दिवशी निघणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे बाहेर खासगीत हजारो रुपये खर्च करून उपचार घेण्यापेक्षा येथील उपचारास प्राधान्य देत असल्याने रुग्णांची संख्या वाढल्याने जागा नसताना रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. यामुळे त्रोटक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असल्याने सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा असूनही त्या देण्यासाठी खूप काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित पाच रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, असा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण अगोदरच त्या रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी दिली होती. मात्र, या प्रकाराने एक वर्षांपासून अवघे दोन, चार, पाच डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देत आहेत. शुक्रवारी (ता. २६) रात्री ऑक्सिजनमुळे पाच जण दगावले, असा वायरल व्हिडीओ हा पूर्णत: खोटा असून, यात चोपडा उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचे मनोबल कमी करण्यासारखा प्रकार झाला आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० रुग्णांची आहे आणि त्यावेळी १७० कोरोना रुग्णांवर उपचार घेत असल्याची माहिती आहे. नागरिकांचा प्रचंड विश्वास असल्याने घरून खाटा येऊन या ठिकाणी उपचार सुरु आहेत.