जळगाव (प्रतिनिधी) घरात झोपलेल्या जागेवर पत्नी दिसून न आल्याने संशयिताने पत्नीचा शोध घेण्यासाठी तो घराबाहेर पडला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर मयत सुरेश परमसिंग सोलंकी (वय २५) हे दोघे जिनिंगच्या मागील बाजूला असलेल्या शेतातील कुट्टीवर आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आले. त्यांना बघताच संशयिताला राग अनावर झाला आणि त्याने कुऱ्हाडीने सुरेशच्या डोक्यावर घाव घालित त्याला यमसदनी धाडले. ही न घटना उघडकीस आल्यानंतर तालुका पोलिसांनी संशयित रामलाल नाना बारेला (वय ४३, रा. केरमला, ता. – वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश) याला ताब्यात घेत दोन तासात खूनाचा उलगडा केला.
जळगाव तालुक्यातील आव्हाणे शिवारात असलेल्या लक्ष्मी जिनिंगमध्ये सुरेश सोलंकी हा मजूर कामाला होता. त्याचा शनिवारी दुपारच्या सुमारास जिनिंगच्या मागील बाजूला असलेल्या शेतातील कुट्टीवर खून करुन रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. दरम्यान, घटनास्थळापासून काही अंतरावर शेतामध्ये महिलेचे मंगळसूत्र व पायातील पैंजण मिळून आले होते. त्यामुळे हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. त्यानुसार तालुका पोलिसांनी घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपासचक्रे फिरवित संशयित महिलेला ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता, महिलेने हा खून तिच्या पतीनेच केल्याची कबुली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी संशयित रामलाल बारेला याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा संशयिताविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला रविवारी न्या. सोनवणी यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. २४ पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यापुर्वीही केली होती मयताला मारहाण !
मयत सुरेश सोलंकी याचे आणि संशयित रामलाल बारेला याच्या पत्नीचे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. दोघेही जिनिंगच्या शेजारी असलेल्या खोल्यांमध्ये वास्तव्यास होते. काही दिवसांपुर्वीच याच कारणामुळे त्यांचे भांडण देखील झाले होते. यावेळी रामलाल याने सुरेश याला मारहाण देखील केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
दोन तासात खूनाचा उलगडा !
घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारावर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, एलसीबीचे पीएसआय गणेश वाघमारे, पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज पाटील, प्रवीण पाटील, चेतन पाटील, रामकृष्ण इंगळे, उमेश ठाकूर, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, तुषार जोशी, प्रवीण कोळी यांच्यासह एलसीबीच्या पथकातील पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, चालक अशोक पाटील यांच्या पथकाने दोन तासात खूनाचा उलगडा केला.
मंगळसुत्राने गवसला तपासाचा धागा !
मयत सुरेश सोलंकीचा ज्याठिकाणी मृतदेह आढळून आला तेथून काही अंतरावरच मंगळसुत्र व नवीन पैंजण पोलीसांना मिळून आले होते. या मिळालेल्या पुराव्यांवरुन पोलीसांकडून घटनेचा तपास केला जात होता. हे मंगळसुत्र पोलीसांनी महिला वास्तव्यास असलेल्या परिसरातील अन्य महिलांना दाखवले असता त्यांनी ते संशयित रामलाल याच्या पत्नीचे असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांना तपासाचा धागा गवसला आणि दोनच तासात संशयित रामलाल नाना बारेला (वय ४३, रा. केरमला, ता. वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश) याला ताब्यात घेत घटनेचा उलगडा केला.