जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी चा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणुकीत नशिराबाद मधील सर्व उमेदवारांनी माघार घेतली. शेवटच्या दिवशी माघार घेण्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असून जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नशिराबाद ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा होता. या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर करण्याची घोषणा २९ डिसेंबर २०२० रोजी नगरविकास विभागाने केली होती. नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरूच होती. या पार्श्वभूमिवर, काल नशिराबाद येथे झालेल्या बैठकीत सर्व उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावे असा निर्णय झाला. या अनुषंगाने आज सायंकाळी सर्वांनी अर्ज मागे घेतले. यामुळे नशिराबाद येथील निवडणूक रद्द झाली आहे. शेवटच्या दिवशी नशिराबादच्या सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या सर्वांचे कौतुक करतांना ते बोलत होते. आपल्या मतदारसंघातील महत्वाचे गाव असणार्या नशिराबदकरांनी दाखविलेल्या एकजुटीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कौतुक केले. त्यांनी तहसील कार्यालयात माघार घेणार्यांचा सत्कार केला. याप्रसंगी पाटील म्हणाले की, मी पाठपुरावा केल्यामुळे नशिराबाद येथे नगरपंचायत मंजूर झाली. यासोबत राज्यातील १३ ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. तथापि, निवडणुकीची नियमित प्रक्रिया सुरूच राहिल्याने थोडे गोंधळाचे वातावरण होते. या पार्श्वभूमिवर, वेळ व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी नशिराबाद येथील सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आदी पक्षांसह अपक्षांनीही एकजुट दाखवत माघार घेण्याचा निर्णय घेतला असून याचे पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बर्हाटे, मनसेचे मुकुंदा रोटे, बापू चौधरी, आसिफ मुब्बलिग, चंद्रकांत भोळे, डायमंड टेलर, फिरोज कुरेशी यांची उपस्थिती होती.