जामनेर (प्रतिनिधी) सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय ३५) हा फरार होता. आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी आज एलसीबीकडे तपास वर्ग केला होता. त्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात संशयिताला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
बालिका केळीच्या शेतात आढळली मृत अवस्थेत !
जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडे बुद्रुक येथील गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंबीय राहतात. ते मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान, सध्या पेरणीचे दिवस असल्याने आपल्या सहा वर्षीय मुलीला घरी सोडून तिचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आई, वडील कामावरून घरी परतले, तेव्हा आपली मुलगी घरात नसल्याचे पाहून त्यांनी तिच्याविषयी शेजाऱ्यांना विचारले. परंतु, काहिही माहिती मिळाली नसल्याने त्यांच्यासह तिच्या नातेवाईकांनी या बालिकेचा सर्वत्र शोध सुरू केला. या वेळी ही मुलगी गावा शेजारील केळीच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आली. मृत बालिकेवर अत्याचार केल्याचा संशय आहे.
भूसावळमधून आवळल्या आरोपीच्या मुसक्या !
या प्रकरणी मयत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जामनेर तालुक्यातील के कतनिंभोरा येथील सुभाष उमाजी भील (वय ३५) या संशयिताविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयित आरोपीचा कसून शोध घेत होते. परंतू घटनेला आठवडा उलटूनही सुभाष हा पोलिसांना गुंगारा देत होता. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज एलसीबीकडे तपास वर्ग करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, आरोपीने आपल्या एका नातेवाईकाला पैशांच्या मदतीसाठी एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून फोन लावला. याची माहिती मिळताच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी आरोपीचे लोकेशन काढले. त्यानुसार संशयित आरोपी सुभाष हा भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात असल्याची निश्चित झाले होते. पो.नि. आव्हाड यांनी एक पथक तात्काळ भुसावळच्या दिशेने रवाना केले. तर भुसावळ पोलिसांना देखील संशयित आरोपी कुठे असल्याची माहिती दिली. त्यानुसार भुसावळ पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले.