जळगाव (प्रतिनिधी) शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे अमिष राष्ट्रीयकृत बँकेच्या व्यवस्थापकाला चांगलेच महागात पडले. त्या व्यवस्थापकाची १ कोटी ६ लाख ५ हजार ९८५ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. १८ जुलै ते दि. २६ सप्टेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी बँक व्यवस्थापकाने सायबर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले व सध्या जळगाव शहरातील एका राष्ट्रीयकृत बँक्त व्यवस्थापकासोबत एक पुरुष व एका महिलेने संपर्क साधला. त्यांनी व्यवस्थपकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवस्थापकाला वेगवेगळ्या व्हाटसअॅप ग्रुपमध्ये अॅड करून एक लिंक पाठविली. तसेच त्यांना एक अॅप्लिकेशन देखील डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार व्यवस्थापकाने ते अॅप्लीकेशन डाऊनलोड करुन समोरील व्यक्तींनी त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, त्यातून नफा मिळविण्याचे अमिष दाखविले. व्यवस्थापकाने सुरुवातीला काही रक्कम भरल्यानंतर त्यावर तीन हजार ५०० रुपये नफा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
व्यवस्थापकाला वेळोवेळी अधिकच्या नफ्याचे अमिष दाखवत त्यांना शेअरमार्केटमध्ये रक्कम गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार दि. १८ जुलै ते दि. २६ सप्टेंबर दरम्यान व्यवस्थापनाकडून सायबर गुन्हेगारांनी तब्बल १ कोटी ६ लाख ५हजार ९८५ रुपये ऑनलाईन नेटबँकींगद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारले. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवणुक करुन देखील व्यवस्थापकाला कुठल्याही प्रकारचा नफा मिळाला नाही. तसेच इतकी मोठी रक्कम हातातून गेल्याने त्याचा कुठलाच परतावा देखील मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याचे समजले.
यानंतर व्यवस्थापकाने दि. २७ सप्टेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या अंकित अग्रवाल व मीरा नामक अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत. फसवणूक झाल्याचे समजताच व्यवस्थापकांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ट्रान्सफर केलेली रक्कम रोखण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र व्यवस्थापकाने एवढी मोठी रक्कम भरल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी ती लगेच काढून घेतल्याने पोलिसांना ही रक्कम रोखता आली नाही.