अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर जवळील मंगरूळ गावाजवळ असलेल्या एमआयडीसीत परिसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याची आज सकाळी उघडकीस आली होती. तुषार चौधरी असे मयत तरुणाचे नाव नाव होते. अमळनेर पोलिसांनी अवघ्या काही तासात तपाचचक्र फिरवीत मुख्य संशयित सागर चौधरी या संशयित आरोपीला दोंडाईचा जवळील मालखेडा येथून ताब्यात घेतले आहे.
तुषार चौधरी हा दि. ५ रोजी रात्री बाहेर गेलेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी परत आला नव्हता. परंतु आज सकाळी मंगरूळ येथील एमआयडीसीमध्ये तो मयत अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्यावर मार लागलेल्याचे खुणा होत्या. तसेच आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. पोलीस पाटील भागवत पाटील यांनी पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली होती.
पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आणि त्यातून धक्कादायक अशी माहिती समोर आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा खून अनैतिक संबंधातून झाला आहे. मयताच्या पत्नीसोबत सागरचे अनैतिक संबंध होते आणि अनैतिक संबंधातील अडथळा दूर करण्यासाठीच सागरने तुषारचा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान मयत तुषारच्या पत्नीला देखील संशयित म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मयत तुषारच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्यानंतर कॉल रेकॉर्ड मधूनही काही गोष्टींचा उलगडा झाला. त्यानुसार मयत तुषारला सागरने पत्रिका देण्याचे बहाण्याने अमळनेर येथे बोलून घेतले. त्यानंतर दोघांनी एका ठिकाणी जात मद्य प्राशन केले. त्यानंतर सागरने तुषारच्या डोक्यात दोन वेळेस दगड टाकला. तसेच त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील केली. तुषार मेल्याची खात्री झाल्यानंतर सागरने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहेत. तसेच मोबाईल कॉल रेकॉर्डमधूनही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलीस सागरपर्यंत पोहोचले.
पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, कैलास शिंदे,पोलीस नाईक संतोष नागरे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, शेखर साळुंखे, विनोद संदांनशिव, उज्वल म्हस्के, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, सागर पाटील यांनी आरोपीच्या अटकेत महत्त्वाची भूमिका बजावली.