जळगाव (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर येथून जळगावकडे दुचाकीने येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या एका तरुणाचा गेल्याच महिन्यात विवाह झाला होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, परवेर निसार खाटीक (वय-२२, रा. लक्ष्मीनगर) व आमिर जाकीर खाटीक (वय- २३, रा. उस्मानिया पार्क) या अशी मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील परवेज खाटीक व आमिर खाटीक हे आतेभाऊ मामेभाऊ आहेत. परवेजचे गेल्या महिन्यात लग्न झाले असून तो शनिवारी आमिर सोबत बर्हाणपुर येथे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेला होता. दुर्दवाने पत्नीची घेतलेली ही भेट त्याची शेवटची भेट ठरली. सायंकाळी बर्हाणुर येथून जळगावला येत असतांना त्याच्या (एमएच १९ सीएच ६०५९) क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, या अपघातात परवेज याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील व रिजवाण, भाऊ इकबाल व इम्रान असा परिवार आहे.
तर या अपघातात आमिरच्या पोटातील आतडे बाहेर येवून तो गंभीर जखमी झाला होता. नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतुन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात वडील जाकीर, आई निलोफर, भाऊ अमान व अबुराज असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच दोघांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. आमिर हा परवेजच्या अत्याचा मुलगा आहे. एकाचवेळी अपघातात आतेभाऊ मामेभाऊंचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा रुग्णालयातील मनहेलावणारा आक्रोश होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.