भुसावळ (प्रतिनिधी) रावेर लोकसभेत महाविकास आघाडीकडून मराठा चेहरा असलेल्या उमेदवाराला संधी मिळेल, असे वृत्त ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने 27 मार्च रोजी दिले होते व हे वृत्त आता प्रत्यक्षात खरे ठरू पाहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रावेर लोकसभेसाठी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून याबाबत अधिकृतरीत्या उद्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. मराठा समाजाचा चेहरा असलेल्या श्रीराम पाटील यांच्या उमेदवारीनंतर एका दगडात शरदचंद्र पवारांनी दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.
उद्योग क्षेत्रात भरीव कार्य
श्रीराम दयाराम पाटील हे 53 वर्षीय उद्योजक असून समाजातील विविध क्षेत्रात देखील त्यांनी काम केले आहे. रावेर तालुक्यातील रणगांव येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांनी स्वतः रावेर येथे श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम फाउंडेशन, श्रीराम अॅग्रो प्लास्ट इंडस्ट्रीज उभारली आहे. याशिवाय श्री साईराम प्लास्टिक आणि इरिगेशन हे रावेर, नशिराबाद, जळगाव अशा ठिकाणी त्याच्या शाखा आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यात त्यांच्या व्यापाराचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. एक सामान्य मेकॅनिकपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजकापर्यंत आहे. त्यांना घरात कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र भूमिपुत्र म्हणून गावाशी नाळ जोडलेले तसेच सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले असे हे व्यक्तिमत्व आहे.
पवारांचा पॉवर गेम
रावेर हा भाजप नेते गिरीश महाजन व सध्या शरद पवार गटात असणारे तथा लवकरच भाजपात जाणार्या आमदार एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे. गत अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने येथून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपाशी दोन हात करता येईल व तुल्यबळ लढत होण्याच्या दृष्टीने शरदचंद्र पवार यांनी पॉवर गेम खेळत मराठा समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून श्रीराम पाटील यांना संधी दिली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर झाली नसलीतरी उद्योजक श्रीराम पाटील यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.
सलग पाच तास चालली बैठक
सोमवारी दुपारपासून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे सत्र पाच तासांपेक्षा अधिक काळ सुरू होते. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष अरूण गुजराथी, जितेंद्र आव्हाड, माजी कृषी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या बैठकीत सर्व इच्छूक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेतून उमेदवारी कोणाला द्यायची हे सस्पेन्स ठेवण्यात आले मात्र तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार असल्याची माहिती आहे.