जळगाव (प्रतिनिधी) कुलगुरूंनी अराजकीय व कठोर भूमिका घेतली असती व पारदर्शक काम केले असते तर आज ही वेळ आली नसती. कुलगुरूंनी कोणाच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला ते नावे जाहीर करावे. तसेच कुलगुरू पी. पी. पाटील यांनी अचानक राजीनामा का दिला ? याचा खुलासा त्यांनी आवर्जून करावा. तसेच राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पियुष पाटील यांनी पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कुलगुरू पी. पी. पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आपण सुरुवातीलाच केली होती. विद्यापीठात चालत असलेला अनागोंदी कारभार राजकीय व्यक्तींचा विद्यापिठात होत असलेला हस्तक्षेप यावर देखील आपण आवाज उठवला होता. कुलगुरू हे त्या ठिकाणी केवळ सयाजीराव म्हणून आपली भूमिका बजावत असल्याचे देखील आपण बोललो होतो. व विद्यापीठात कुलगुरू हे कटपुतलीप्रमाणे काम करत असल्याचे बोललो होतो. तसेच कुलगुरू हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आपण त्यावेळी केला होता. पण कुलगुरूंनी तो फेटाळला होता. मग आता अचानक कुलगुरू महोदय यांनी राजीनामा का दिला ? याचा खुलासा मा.कुलगुरू पी. पी. पाटील यांनी आवर्जून करावा.
राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का ?, कोणाच्या छळाला कंटाळून कुलगुरूंनी राजीनामा दिलेला आहे, असे काय घडले की इतका तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला, कुलगुरूंना कोणी कोणी छळले ते नावे कुलगुरू महोदय यांनी जाहीर करावीत. असे प्रश्न सामाजिक कार्यकर्ता पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी उपस्थित केला आहे.