सातारा (वृत्तसंस्था) येणाऱ्या काळात राज्यात मुख्यमंत्री (Maharashtra CM) हा आपलाच असेल असे विधान धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी साताऱ्यातील डिस्कळ येथील शेतकरी मेळावाच्या सभेत हे विधान केले आहे.
ते म्हणाले, ‘कितीही मजबूत सरकार असलं तरी विरोधी पक्षनेता असताना त्या सरकारला गदागदा हालवण्याचं काम मी केलं. आज शब्द देतो येणाऱ्या काळात जर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपद कोणाला द्यायचा उद्या जर प्रस्ताव आला मुख्यमंत्री कोणीही असतील, आपलेच असतील, मात्र, ते पद आपल्याशिवाय कोणाला देणार नाहीत येवढी प्रतिष्ठा या मंत्रीपदाच्या कामांमुळे कमावली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
मंत्री धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याच्या आता राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु असून राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलं आहे की काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे, अख्खा पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईल असं तुळजाभवानी मातेला साकडं घातलं होतं. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाचं वेध लागलं आहे की काय अशा चर्चा सुरु आहेत.