जळगाव (प्रतिनिधी) दूध खरेदी करून पायीच घराकडे निघालेल्या वृद्ध शिक्षकाला भरधाव डंपरने चिरडल्याची घटना बुधवारी घडली. पुंडलिक भिका पाटील (वय ७५, रा. शिवराणा नगर), असे मयत शिक्षकाचे नाव आहे. ही घटना मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता गुजराल पेट्रोल पंप चौकात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर येथील शाळेतून निवृत्त झालेले पुंडलिक पाटील हे शिवराणा नगरात पत्नीसह राहत होते. मंगळवार दि. १३ फेब्रुवारी सकाळी ते चहासाठी दूध खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले. गुजराल पेट्रोलपंप चौकातून दूध खरेदी करून रस्ता ओलांडत असताना जळगावकडून पाळधीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर तेथे असलेल्या रिक्षा चालकांनी त्यांच्या घरी अपघाताची माहिती दिली. त्या वेळी घराजवळच राहणारे पाटील यांचे भाचे डॉ. सुनील पाटील व अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी त्यांना मयत घोषित केले. पुंडलिक पाटील यांना एकच मुलगा असून तो व त्याची पत्नी हैद्राबाद येथे नोकरीला आहे.
दरम्यान, पुंडलिक पाटील यांना धडक दिल्यानंतर चालक डंपर घेवून तेथून पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामांद नगर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. काही वेळानंतर डंपर चालक रामानंद नगर पोलिस ठाण्यात हजर झाला. अपघाताची माहिती मिळताच पुंडलिक पाटील – यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. रुग्णालयात पुंडलिक पाटील यांना मयत घोषीत केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला.
















