संगमनेर (वृत्तसंस्था) जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी सोमवारी आपला संप मागे घेतला. सोमवारी पेन्शन आंदोलन आटोपून घरी परतणाऱ्या एका शिक्षकाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात शिक्षक अजय चंद्रभान नन्नवरे (वय 36, रा. सायखिंडी, ता. संगमनेर) व चालक दूध टँकर चालक विलास रविंद्र ठोंबरे (वय 23, रा. शिवलवाडी, ता. मंचर) या दोघांचा मृत्यू झाला.
जय चंद्रभान नन्नवरे हे संगमनेर तालुक्यातील पिंपारणे येथे नुकतीच बदली करुन रुजू झाले होते. आंदोलन झाल्यानंतर नन्नवरे हे आपल्या शाळेवर आपल्या शिक्षक मित्रासोबत गेले होते. शाळेचे काम आटोपल्यानंतर ते संगमनेर कडे येत होते. मित्राला घराकडे सोडल्यानंतर नन्नवरे हे सायखिंडी येथे जात होते. नाशिकहून पुण्याकडे जाणारा दुधाच्या छोटा टँकर क्र. (एम.एच 14 एच यु 0055) याने सायखिंडी फाट्यावर डिव्हायडर तोडून विरुद्ध बाजुने चाललेल्या नन्नवरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये शिक्षक नन्नवरे यांच्यासह दूध टँकर चालक ठोंबरे याचा जागीच मृत्यू झाला.