वर्धा (वृत्तसंस्था) शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटाव्हेटर सुरू असताना चालकाचा अचानक तोल गेल्याने ट्रॅक्टरवरून खाली पडला. याचवेळी त्याच्या अंगावरून रोटाव्हेटर गेल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समुद्रपूर तालुक्यातील निरगुडी येथे घडली आहे. पूरूषोत्तम देवराव धोटे असे मृतक चालकाचे नाव आहे.
निरगुडी येथील नीलेश धोटे यांनी आपल्या शेतात रब्बी हंगामाकरिता शेतीच्या मशागतीसाठी बुधवारी रोटावेटर यंत्र असलेला ट्रॅक्टर बोलविला होता. दुपारी शेतीची मशागत सुरू असताना अचानक ट्रॅक्टरचालक पुरषोत्तम धोटे यांचा ट्रॅक्टरवरून तोल जात खाली पडले. यात चालक पुरषोत्तमच्या अंगावरून टॅक्टरचे मोठे चाक गेले व त्याचे पाय रोटावेटरमध्ये अडकले. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. समुद्रपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.