चाळीसगाव (प्रतिनिधी) थर्टी फर्स्टला गडकिल्ल्यांवर पार्ट्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात सह्याद्री प्रतिष्ठानने आज चाळीसगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांवर संवर्धन कार्य करत असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून अनेक मावळ्यांनी त्यासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यावर अनेक समाध्या व देवी देवतांची मंदिरे आहेत. त्यामुळे म्हणून हे गडकिल्ले पवित्र तीर्थस्थाने मानली जातात. अशा या गडकिल्ल्यांवर दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी काही ठराविक पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारे लोक दारू मटणाच्या पार्ट्यांचे आयोजन करून त्या ठिकाणी हिडिसपणा धिंगाणा घालण्याचे काम करीत असतात. यामुळे गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग होते आणि गड प्रेमी शिवप्रेमी ही गोष्ट खपवून घेत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाद-विवाद होण्याची शक्यता असते, तेव्हा तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस गस्त ठेवावी तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई, अशी मागणी निवेदनाद्वारे सह्याद्री प्रतिष्ठाने केली आहे.
चाळीसगाव तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या किल्ले राजदेहरे, किल्ले कन्हेरगड, किल्ले मल्हारगड, या ठिकाणी किल्ल्यांच्या पायथ्याला दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस गस्त ठेवावी. तसेच या ठिकाणी दारू मटणाच्या पार्ट्या करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे उपद्रव कोणी करणार नाही. अगदी आवश्यकता वाटल्यास आपण सूचना केल्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य पोलिसांच्या मदतीस देखील हजर राहू शकतील,अशा आशयाचे निवेदन आज चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुंदरडे साहेब यांना देण्यात आले.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे,जिल्हा प्रशासक गजानन मोरे, जिल्हा अध्यक्ष रणजित पाटील ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाटील, दीपक राजपूत योगेश शेळके तालुका संपर्कप्रमुख जितेंद्र वाघ,पप्पू पाटील,,राहूल पवार,बाळासाहेब सोनवणे मोहन भोळे,मयूर भागवत जितेंद्र वरखेडे विलास चव्हाण शुभम घोरपडे भाऊसाहेब पाटील उमेश खेडकर शुभम निकूंभ मनोज बयास आर्यन माळी आदी सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक उपस्थित होते.















