जळगाव, (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविधरंगी पणत्या प्रज्वलित करून हा उपक्रम चिमुकले श्रीराम मंदिरात पार पडत असतो. यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात ११५१ पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, ह.भ.प. दादा महाराज जोशी, जैन उद्योग समुहाचे मीडिया संचालक अनिल जोशी, सुनील खैरनार, फिलिक्स (बेल्जीयम), उद्योजक विनोद बियाणी, माजी नगरसेवक अमित काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रतर्फे आयोजित हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून दिव्यांग मुलांनी केलेली मेहनत आणि कलाकुसर कौतुकास्पद आहे. आगळीवेगळी दिवाळी समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले. उडाण एक संस्था नव्हे दिव्यांगांना स्वबळावर उभे करण्याचा विचार आहे. दिवाळीच्या अगोदर दिव्यांग विद्यार्थी स्वतः ३ लाख पणत्या सुशोभित करतात, त्यातून त्यांना रोजगार देखील मिळतो. दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात सकारात्मतेचा प्रकाश पडावा आणि दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला व्हावा, हाच आमचा उद्देश असल्याचे हर्षाली चौधरी यांनी सांगितले.
उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, प्रवीण चौधरी, धनराज कासट, सविता नंदनवार, हेतल पाटील, जयश्री पटेल, हेमांगी तळेले, विनीत आहुजा, महेंद्र पाटील, ज्योती रोटे, प्रतिभा पाटील, रितेश पाटील, वनमाला कोळी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन स्वाती ढाके यांनी केले.
















