पुणे (वृत्तसंस्था) ‘गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांचं निधन झालं आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८९ वर्षांचे होते.
संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.
‘गाणारे व्हायोलिन’
‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहिती झाले. प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ‘गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोगही रंगमंचावरुन व्हायोलिनचे कार्यक्रम करतात.
















