नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यान केंद्राकडून लसीकरण मोहिमेचा वेग वाढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यातच आता भारतानं गेल्या महिन्यांत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला भारतात लसीकरणासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन नंतर आता स्पुटनिक-व्ही लसींचे डोस भारतीयांसाठी उपलब्ध झाले आहेत. आज स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात दाखल झाली असून पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
‘स्पुटनिक व्ही लस भारतात आली आहे. मला सांगण्यात आनंद वाटत आहे की, पुढच्या आठवड्यापासून ही लस भारतात मिळण्यास सुरुवात होईल. रशियातून आलेल्या लशींची लवकरच विक्री सुरु होईल.’, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं आहे.
स्पुटनिक व्ही लशीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. भारतात स्पुटनिक व्ही लशीची निर्मिती रेड्डीज लॅबोरेटरीज करणार असून भारताच्या औषध महानियंत्रकांनी या लशीस केंद्रीय औषध प्रमाणन व नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या लसीचं उत्पादन जुलै महिन्यात सुरु होईल असंही वीके पॉल यांनी सांगितलं. या लशीचे १५.६ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. तर भारतीयांसाठी ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान २१६ कोटी डोस तयार केले जातील.