धाराशिव (वृत्तसंस्था) शाळेत आलेल्या विद्यार्थिनींकडून पाय चेपून घेणाऱ्या वादग्रस्त मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामध्ये हा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके यांनी सोमवारी ही कारवाई केली आहे. दरम्यान, मुख्याध्यापिकेवर विद्यार्थिनींचा डबा फस्त करणे, खाण्यासाठी घरचे पदार्थ करून आणण्यासाठी बोलत त्यांच्यावर दबाव टाकण्याचेही आरोप आहेत.
कडकनाथवाडी (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका ए. बी. मोराळे या विद्यार्थिनींकडून पाय चेपून घेत -असल्याची तक्रार शिक्षण विभागाला प्राप्त झाली होती. त्यावर लोहारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला होता. अहवालात मोराळे यांच्यावर उर्मट वर्तनाचा ठपका ठेवण्यात आला होता.
शाळेतील मुलींचे डब्बे खाणे, मुलींना पाय चेपायला सांगणे, घरातून येताना मुलींना खाण्याचे पदार्थ आणण्यासाठी दबाब टाकणे, स्वतः शाळेत वेळेवर न येता पालकांशी असभ्य भाषेत बोलणे असे आरोप पालकांनी तक्रारीत केले होते. या तक्रारींची शहानिशा करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच कारणावरून पालकांनी नुकतेच शाळेला कुलूप लावले होते. त्यानंतर तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे.
चौकशी अहवालात मुख्याध्यापिका मोराळे यांनी केलेल्या कृत्याच्या अनेक बाबी उघड झाल्या आहेत. अभ्यासाव्यतिरीक्त मुलींवर वाइट परिणाम होईल, असे गाणे लावून त्यावर मुलींना डान्स करण्यास लावल्याचाही ठपका ठेवला आहे. मुलींना नेहमी वाईट भाषा वापरणे, शाळेत उशीरा येणे, पालकांशी असभ्य भाषेत संवाद साधणे, शाळेतील सर्व मुलींना दबावाखाली ठेवणे, कोणताच उपक्रम न घेणे आदी संदर्भातही त्यांच्यावर ठपका ठेवण्या आला असल्याचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.