जळगाव (प्रतिनिधी) हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपये परत मागितल्याचा राग आल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण करीत जखमी केल्याची ही घटना मढीचौकात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पिंप्राळा परिसरातील कोळी वाड्यात गोपाळ सोनू कोळी (वय ३४) हा तरुण वास्तव्यास असून तो हातमजूरी करतो. दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पिंप्राळा स्टॉपवरुन मढी चौकात दुचाकीने जात होते. त्याठिकाणी बंटी रमेश कोळी व त्याच्यासह इतर दोघे थांबले होते. त्यावेळी गोपाळ कोळी याने बंटी याला हातउसनवारीने दिलेले ५० हजार रुपये मागितल्याचे वाईट वाटल्याने त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोपाळ कोळी याला जमिनिवर पाडून छातीत आणि पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी रॉडने मारहाण करीत केली दुखापत तिघांकडून मारहाण होत असतांना बंटी कोळी याने त्याठिकाणी पडलेल्या लोखंडी रॉडने गोपाळच्या पाठीवर आणि पोटावर व पायावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यावेळी त्यांच्या तावडीतून सुटून गोपाळ तेथून पळून गेला. दरम्यान, गोपाळ कोळी याला खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.