जळगाव (प्रतिनिधी) पगार बिलामध्ये काहीही त्रुटी न काढता, त्यावर स्वाक्षरी करुन ते बिल समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या मोबदल्यात पहिला हप्ता म्हणून पाच हजारांची लाच स्विकारणाऱ्या जिल्हा परिषदेतील दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ माजून गेली आहे.
तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्रात नोकरीस आहे. दि. १४ जून रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेतील दिव्यांग विभागात गेले होते. त्यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांची त्यांनी भेट घेतली. तक्रारदारांचे जुन,
२०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे १२ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यांनी याबाबतची तक्रार दि. २२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
या पथकाची कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक सुरेश पाटील, शैला धनगर, प्रनेश ठाकूर, सचिन चाटे यांच्या पथकाने केली.