धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात दोन गावातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच इलेक्ट्रिक मोटार लंपास केल्या आहेत. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील वाघळूद खु. आणि भवरखेडे गावात अज्ञात चोरट्यांनी शेतातून आणि दुकानातून तब्बल पाच इलेक्ट्रिक मोटार लंपास केल्या आहेत. या प्रकरणी पहिल्या फिर्यादीत सुरेश दौलत पाटील (वय ६२, रा. वाघळूद खु.) यांनी म्हटले आहे की, दि. २ ते ३ जानेवारीच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने शेतातील विहिरीत असलेली १४ हजार ५०० रुपये किंमतीची एम टेक कंपनीची इलेक्ट्रिक मोटार चोरून नेली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत स्वप्नील अधिकार पाटील (वय ३४, रा. भवरखेडे) यांचे गावातील बस स्टॅड जवळील दीपिका इलेक्ट्रीकल्स हे दुकान आहे. दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी रात्री अडीच ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान, दुकाना समोर ठेवलेल्या वेगवेगळ्या कंपनीच्या ४ इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.कॉ. खुशाल पाटील हे करीत आहेत.