जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असणाऱ्या साई गजानन अपार्टमेंटमध्ये आज दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत १५ हजार रुपयाची रोकड लंपास केली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सुमन भीमराव अहिरे (वय ५० वर्ष, रा.साई गजानन आपारमेंट दुसरा मजला प्लॉट क्रमांक १४) या आपला मुलगा राजेश आहिरेसह या ठिकाणी राहतात. सुमन मोरे यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तर तर मुलगा डी-मार्टमध्ये कामाला आहे. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे सुमन अहिरे या भाजीपाला विक्रीसाठी कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या होत्या. तर राजेश अहिरे हे देखील डी-मार्ट येथे सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास कामाला गेले. परंतू दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घरी परत आल्यानंतर त्यांना आढळून आले की, त्यांच्या घराचा दरवाजाचे कडीकोंडा तुटलेला आहे. घरात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, गोदरेज कपाट अज्ञात चोरट्यांनी फोडले असून त्यातील १५ हजाराची रोकड लंपास केलेली आहे. यासंदर्भात सुमन अहिरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे हे करीत आहे.