मुंबई (वृत्तसंस्था) आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएन्टनं परत चिंता वाढवली आहे. जर ओमायक्रॉन असाच राज्यात वाढत राहिला तर सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागतील, असा इशाराच शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन प्रकरणांबाबत वाढलेल्या चिंतेला उत्तर देताना राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितले की प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. देशातील एकूण २१३ ओमायक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद केली गेली आहे. “ओमायक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले.