मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे या प्रकरणात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असं त्यांनी आयोगाला सांगितल आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह बेल्जियममध्ये असल्याचा आरोप रविवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला होता. परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी सांगितल्याचा दावा केला होता. हे पत्र प्रकाशात आल्यापासून ते माध्यमांसमोर आलेले नाहीत.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांची नियुक्ती केली आहे. चांदिवाल आयोगाने अनेकदा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी किंवा त्यांची बाजू आयोगापुढे मांडण्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीत. यासाठी न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाने त्यांना दोन वेळा आर्थिक दंडही सुनावला आहे. पहिल्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. पाच हजार आणि दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याबद्धल त्यांना रु. २५ हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे.
याप्रकरणी स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असलेले वकील शिशीर हिरे यांनी सांगितलं की परमबीर सिंह यांनी त्यांच्या आरोपासंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे. अॅड. शिशीर हिरे हे चांदिवाल आयोगाचे वकील आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राशिवाय, त्यांच्या आरोपाबाबत त्यांच्याकडे अतिरिक्त तपशील किंवा पुरावे नसल्याचं परमबीर सिंह यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे कळवल्याचं शिशीर हिरे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी परमबीर सिंह कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचं हिरे यांनी सांगितलं.