मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना कोर्टाकडून आजही दिलासा मिळाला नाही. संजय राऊतांची न्यायालयीन कोठडीत आजच्या सुनावणीत कोर्टाने आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र आज देखील त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. मुंबईतील 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली होती.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची आज न्यायालयाने दखल घेतली. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असं संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. कोर्टाच्या आदेशानंतर आज ही प्रत देऊ असं ईडीने सांगितलं. जोपर्यंत तुम्ही आरोपपत्र देत नाही, तोपर्यंत संजय राऊत यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करत असल्याचं कोर्टाने म्हटलं.