मुंबई (वृत्तसंस्था) मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने वीज बिल वसुलीबाबत आदेश काढले होते, त्यावर बोलताना ऊर्जामंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे ग्राहकांना संपूर्ण वीज बिल भरावेच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. ‘महावितरणचे जसे वीज ग्राहक आहेत, त्याचप्रमाणे महावितरणही एक ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावी लागते. विविध प्रकारचे शुल्क द्यावे लागते. महावितरणची सध्याची थकबाकी ३१ टक्के आहे. ग्राहकांकडून देयके भरली जात नाहीत. त्यामुळं सवलत दिली जाणं अशक्य आहे. मात्र, कोणाचीही वीज जोडणी कापली जाणार नाही. तसेच तुम्ही जसे ग्राहक आहात तसं आम्ही सुद्धा वीज ग्राहक आहोत, आम्हीसुद्धा वीजेचं बिल देतो. वापरापेक्षा वाढील बिल आली असतील तर त्याची चौकशी सुरु आहे. पण ज्यांनी वीज वापरली त्यांना बिल भरावे लागेल. वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे, कोणाचाही वीज पुरवठा खंडित होणार नाही. राज्यातील वीजबिलाच्या सवलतीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला होता परंतु केंद्र सरकारने मदत केली नाही त्यामुळे वीजबिलात माफी नाही असे नितीन राऊत म्हणाले.