नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तीन कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या तीन कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी आजपासून राजधानी दिल्लीमध्ये किसान संसदेचे आयोजन केले आहे. या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. हे शेतकरी नाहीत तर मवाली असल्याचं त्या म्हणाल्या. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आंदोलक शेतकऱ्यांनी आजपासून सुरू केलेल्या किसान संसदेबाबत प्रतिक्रिया देताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, हे शेतकरी नाहीत तर मवाली आहेच. त्याची दखल घेतली पाहिजे. या सर्व गुन्हेगारी कारवाया आहेत. २६ जानेवारीला जे काही झाले होते. तेसुद्धा लाजीरवाणे होते. गुन्हेगारी कृत्ये होती. त्यात विरोधी पक्षांकडून अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले गेले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी आजपासून दिल्लीत किसान संसदेची सुरुवात केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘शेतकरी संसद’द्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारले जाईल. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी आजपासून ९ ऑगस्टपर्यंत दररोज फक्त २०० शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगिले की, दररोज २०० शेतकऱ्यांचा एक समूह पोलिसांच्या सुरक्षेत सिंघू बॉर्डरवरुन जंतर-मंतरला येईल आणि सकाळी ११ पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करता येईल.
















