मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात करोना काळात आलेल्या वाढीव वीजबिलावरून चांगलेच राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. अशातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात करोनाबरोबरच वाढत्या वीजबिलाच्या मुद्यांने उग्र रुप घेतले आहे. करोना काळात वाढीव वीजबिले आल्याने नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहिली आहे. वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरून मनसे आणि भाजप राज्यभर आंदोलने करत आहेत. यावर नितीन राऊत यांनी वीज बिलाच्या मुद्द्यावरुन आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली वीजबिले भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिले भरू नका हा कुठला न्याय आहे?, असा प्रश्न विचारला आहे.
तसेच, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्राने राज्याच्या हक्काचा पैसा दिलेला नाही. राज्याने सगळी तिजोरी करोनाकडे वळवली आहे. वीजबिलमाफीसाठी राज्य सरकारमध्ये कुणी अडचण आणण्याचा प्रश्न नाही. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, नितीन राऊतांच्या या वक्तव्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे. ‘आम्ही वीजबिल भरुच आणि ते भरायलाच हवे. नितीन राऊत यांनीही ते भरायला हवे. प्रश्न लोकप्रतिनिधी किंवा नेत्यांचा नाही. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या गरीब जनतेचा आहे. हजारो रुपयांची बिले ते भरणार कुठून? हा प्रश्न आहे, असे बावनकुळे यांनी म्हंटले आहे.