जळगाव (प्रतिनिधी) शहरातील दाणाबाजार परिसरात रविवारी १४ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास चार दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी धान्याचे पोते चोरून नेले होते. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्याच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ईच्छादेवी चौकातून एका संशयीताला अटक केली आहे. त्याने तीन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरात लक्ष्मीनारायण झवर ॲण्ड सन्स या दुकानाचे रविवारी १४ जुलै रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कुलूप तोडून दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच जयहिंद ट्रेडिंग दुकान, दर्शन ट्रेडिंग कंपनी व राज ट्रेडिंग कंपनी या दुकानांचेही कूलूप तोडून तेथून एकूण ५० हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. या सर्व चोरी पहाटे ३.३० ते ४.३० वाजेच्या दरम्यान झाल्या आहेत. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाला होता. शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्ह्याचा शोध सुरु होता.
दाणाबाजारातील संशयित आरोपी हा ईच्छादेवी चौकातील कॅमेरातही स्पष्टपणे आढळून आला. पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने निरीक्षक बबन अव्हाड, यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, मनोज सुरवाडे, विजय पाटिल, विष्णु बिऱ्हाडे, अभिलाषा मनोरे, प्रमोद ठाकुर यांच्या पथकाने गुप्त माहिती काढून संशयीताचा शेाध घेतला. प्रवीण वसंत सपकाळे (वय-२६, रा.तानाजी मालुसरे नगर, आसोदारोड, जळगाव) याची माहिती मिळाली. संशयीताला ताब्यात घेतल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत असतांना त्याला सिसीटीव्हीतील फुटेज दाखवले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने ३४ हजार २२५ रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल व रोकड जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.