जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे (Shiv Sena) नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात माझ्या जिल्ह्यात एकनाथ खडसे (Eknath Khadse) सारखा डाकू असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना उद्देशून बोलताना ‘चोरों को सारे नजर आते है चोर’ असा खोचक शेर म्हणत निशाणा साधला आहे.
आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसेंसारखा डाकू बसलाय – गुलाबराव पाटील
अहमदनगर येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यात ‘आमच्या जिल्ह्यात एकनाथ खडसेंसारखा डाकू बसला आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी रात्री नशिराबाद येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गुलाबराव पाटील यांच्यावर पलटवार केला.
‘चोरो को सारे नजर आते है चोर’ – खडसे
गुलाबराव यांसारख्या उच्चशिक्षित निर्व्यसनी आणि कर्तव्य पर अशा स्वरूपाचे मंत्री महोदय एकनाथ खडसे आमच्या जिल्ह्यात दाखवा आहेत असं म्हणतात. मला वाटतं अशा निर्व्यसनी माणसाविरुद्ध न बोललेलं बरं ‘चोरो को सारे नजर आते है चोर’ अशा शब्दात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे.
पालकमंत्र्यांनी खडसेंची माफी मागावी : राष्ट्रवादी
या दोन्ही नेत्यांच्या वादात आता राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिक्रिया उमटली आहे. पालकमंत्री पाटील यांची एकनाथ खडसेंविषयी बोलताना वारंवार जीभ घसरते. त्यांच्या बोलण्यातून नेहमीच आकस दिसून येतो. तर दुसरीकडे भाजप नेत्यांकडे लोटांगण घालतानाचे उदाहरण लपून राहिलेले नाही. पालकमंत्र्यांना आघाडी धर्माचा विसर पडतो की काय? भाजप नेत्याने जशी चावी फिरवली तसे गुलाबराव पाटील हे नाचतात अशी शंका उपस्थित केली. खडसेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा जळगाव महानगराध्यक्ष लाडवंजारी यांनी दिला आहे.