जळगाव (प्रतिनिधी) शालकाच्या लग्नासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी हातसफाई केली. ही घटना मोहाडी रोड परिसरातील शिवशंभू नगरात बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी रोकडसह देवघरातील चांदीची मुर्ती असा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मोहाडी रोड परिसरातील शिवशंभू नगरात केशव आनंद चव्हाण हे वास्तव्यास असून ते एका खासगी कंपनीत चालक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या शालकाचे लग्न असल्याने दि. २९ रोजी ते सहकुटुंब चाळीसगाव येथे गेले होते. तेव्हापासून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड आणि चांदीचे दागिन्यांसह देवघरातील देवीची मुर्ती चोरट्यांनी चोरुन नेली.
बुधवारी सकाळच्या सुमारास केशव चव्हाण हे घरी परतल्यानंतर त्यांना घराचा कडी कोयंडा तुटलेला दिसून आला. त्यामुळे त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. याप्रकरणी केशव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकला सामान कपाटात ठेवलेली रोकड आणि चांदीचे दागिन्यांसह देवघरातील देवीची मुर्ती चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.