चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील भडगाव रोडवरील एका दुचाकी विक्रीच्या शोरूममध्ये अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांच्या रोख रक्कमेची चोरी केल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले.
या दुचाकी शोरूममध्ये काल जवळपास १५ ते १६ वाहनांची विक्री झाली होती अन् त्याची रोख रक्कम शोरूममध्येच ठेवण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधून रात्री शोरूममध्ये प्रवेश केला आणि काही रक्कम चोरून घेतली, तर काही रक्कम तशीच राहिली. या प्रकरणी तपासासाठी दुपारी जळगाव येथून विशेष पथक चाळीसगावात दाखल झाले होते. मात्र शहर पोलिस स्टेशनला उशिरापर्यंत गुन्हा नोंदवला न गेल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
 
	    	
 
















