जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटमधील वरिष्ठ तृतीयपंथी जगन मामा उर्फ राणी जान यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. जगन मामा यांच्या निधनाने शहरातील किन्नर समाजात शोककळा पसरली आहे.
जळगाव शहरातील किन्नर समाजातील प्रमुख राणी सविता जान उर्फ जगन मामा हे गेल्या अनेक वर्षांपासून गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर वास्तव्यास होते. ते मूळचे शिरपूर तालुक्यातील वरूर जवखेडा येथील होत. प्रारंभी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी त्यावेळी वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केले, तसेच शेतात मोलमजुरीही केली. जळगावात आल्यानंतर पोलीस मेस मध्ये काही काळ कार्य केले. मागील तीन महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. जगन मामा हे उपचारार्थ गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यांच्या जाण्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील किन्नर समाजात शोककळा पसरली आहे. अत्यंत बोलका आणि मिश्किल असा त्यांचा स्वभाव होता. गोलाणी मार्केटमध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा चाहता परिवार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.