मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. ड्रमायन, त्यांच्यावरील कारवाईवर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. कारवाईवर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असे खोचक वक्तव्य केले आहे. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झाले असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यता आले असता ते म्हणाले की, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”..असेही त्यांनी म्हटले.
ईडीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यानुसार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.
भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असे म्हणत कारवाईचे स्वागत केले आहे.