धरणगाव (प्रतिनिधी) अमळनेरकडे दुचाकीने जाणाऱ्या जळगावच्या एका बांधकाम ठेकेदाराकडून अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल अडीच लाखांची लुट केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी धरणगावपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर म्हसले (ता. अमळनेर) गावी दुपारी घडली. बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पाठीत चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.
या संदर्भात अधिक असे की, राजेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून अमळनेर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत एका जागेच्या व्यवहारासाठी नेत असलेली अडीच लाखांची रोकड होती. धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आताच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने तीन वार केले आणि त्यांच्याकडील अडीच लाख रुपये व दुचाकी हिसकावून चोरटे अमळनेरच्या दिशेने पसार झालेत.
यानंतर सूर्यवंशी हे जखमी अवस्थेत म्हसले गावाकडे निघाले. त्याचवेळी धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते. त्यांनी जखमी सूर्यवंशी यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती केली. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात रवाना केले. तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.