भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील कवाडे नगरात गावठी कट्ट्याचे मॅग्झीनसह तीन जंगलेले काडतूस आढळून आली आहेत.
शहरातील कवाडे नगर भागातील बौद्ध विहाराजवळ वास्तव्यास असलेल्या दोन घरामागील भिंतीजवळ मोकळ्या जागी काडतूस व मॅग्झीन पडून असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण यांना गुरुवारी रात्री 11 वाजता मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू, जाकीर मन्सुरी, जुबेर शेख, मोहम्मद वली सैय्यद आदींनी रात्रीच घटनास्थळ गाठत बेवारसरीत्या पडून असलेले मॅग्झीन व तीन गंजलेली काडतूस जप्त केले होते. भुसावळ शहर पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केला नसलातरी स्टेशन डायरीला त्याबाबत नोंद केल्याचे कळतेय. दरम्यान, भुसावळात नेहमीच गावठी कट्टे आढळून येत असल्यामुळे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, अशी मागणी होत आहे.