जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्यावतीने गेल्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनी जाहीर केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार यादीत तीन अपत्य असलेल्या उर्दू माध्यमाच्या उपशिक्षिकेचे नाव तबस्सुम शेख असगर आहे. या शिक्षिकेचे नाव पुरस्कार यादीतून वगळण्यात यावे, अशी तक्रार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने नुकतीच करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे यांना याबाबत विस्तृत तक्रार देऊन संबंधित उपशिक्षिका यांचे पुरस्कार यादीतून नाव वगळून त्यांना तीन अपत्ये असल्याने त्यांची चौकशी व्हावी व शासन नियमानुसार त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा रावेर पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाण-घेवाण करून केलेल्या या घोळाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा ईशारा तक्रारीतुन देण्यात आला आहे. ही लेखी तक्रार करतांना अमोल कोल्हे, सुरेश तायडे, साहेबराव वानखेडे, संजय ठाकूर, निलेश बोरा आदी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.