जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाकडून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यात महापालिकेच्या नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची जळगाव शहर अध्यक्षपदी, जळगाव ग्रामीण अध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर रावेर ग्रामीण अध्यक्षपदी अमोल हरिभाऊ जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून तीन जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपतर्फे जिल्ह्यात यापूर्वी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण व जळगाव शहर असे दोन अध्यक्ष दिले होते. यात बदल करत आता तीन अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत.
जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ निहाय दोन अध्यक्ष देण्यात आले आहेत. तर शहरासाठी स्वतंत्र अध्यक्ष आहेत. जळगाव ग्रामीणसाठी ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रावेर ग्रामीणचे अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे हे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी खासदार (कै) हरिभाऊ जावळे यांचे पुत्र आहेत. तर जळगाव शहर अध्यक्ष उज्वला किरण बेंडाळे या भाजपच्या महापालिकेत नगरसेविका आहेत. शहराध्यक्षपदी पक्षाने प्रथमच महिलेला संधी दिली आहे.