जळगाव (प्रतिनिधी) आज पहाटे चार वाजेच्या सुमारास जळगाव येथील भाजीपाला मार्केट समोर झालेल्या विचित्र अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध धरणगाव येथील भाजीपाला विक्रेत्याच्या फिर्यादीवरून अज्ञात मिनीट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात धरणगाव तालुक्यातील धानोरा येथील भाजीपाला विक्री करणारे नितीन सुभाष महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मिनी ट्रक (एम.एच. १९ डी.एम ४७०३) मध्ये दिलीप पाटील (रा. पष्टाने ता.धरणगाव) यांच्या शेतातील मिरची भरून जळगाव येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन येत होतो. जळगाव मार्केटकडे जाणाऱ्या रोडने येत असताना पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास माझ्या मिनी ट्रक समोरून एक होंडा शाईन मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९ ए.डब्ल्यू १९६२) यावरून दोन इसम व एक महिला जात होत्या. यावेळी त्यांच्या समोरून एक टाटा कंपनी मेगा मिनी ट्रक (एम.एच. १९ सी.वाय ०७६१) च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने चालवत रॉंग साईडने येऊन मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यानंतर त्याने माझ्या मिनी ट्रकला देखील समोरून धडक दिली. या अपघातात मला मानेला, उजवा हात व उजवा पायाला मुका मार लागला. तसेच माझ्या गाडीमध्ये बसलेले दिलीप पाटील यांना देखील मुका मार लागला. यानंतर आम्ही खाली उतरून पाहिले असता मोटरसायकलवरील तिघंही जण जखमी होऊन रोडवर पडलेले होते. सदरचा अपघात झाल्यानंतर अपघात करणारा मिनी ट्रक चालक यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर लोकांची गर्दी जमली व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले मोटरसायकलवरून जखमी झालेले इसमाचे नाव श्यामलाल केवट (वय ३८) दीपक केवट (वय ३५) महिला नेभासुभा केवट (वय ३५) असे या अपघातात मयत झाले. यासंदर्भात अनोळखी मिनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातातील मयत हे सुमारे १५ वर्षापासून जळगाव येथे वास्तव्यात होते. ते संत कवर राम शाळेजवळ राहत होते. लॉकडाऊनमुळे काम सुटल्यामुळे त्यांनी भाजीपाला विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. ते सिंधी कॉलनी जवळ भाजीपाला विक्री करीत होते. आज रोजी भाजीपाला घेण्यासाठी येत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. दरम्यान, अपघाताची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मिळाल्यावर लागलीच पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर व चालक रवींद्र चौधरी असे घटनास्थळी रवाना झाले होते. त्यांनी लोकांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ आम्ही दवाखान्यात पाठवले. घटनास्थळीच दोघे नवरा-बायको हे मयत झाले होते.तर तिसऱ्या जखमीचा गोदावरी येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे रतिलाल पवार करीत आहे. सर्वांचे प्रेत हे अंत्यविधीसाठी त्यांच्या मूळगावी सतना मध्यप्रदेश येथे घेऊन जाणार असल्याचे कळते.