जामनेर (प्रतिनिधी) येथील पुऱ्यातील विवेकानंद नगरात काही तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही तरुणांनी एका घरात घुसून मारहाण केली. या वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र यावेळी पोलिसांवरच तरूणांनी दगडफेक केली. संतप्त पोलिसांनी खाक्या दाखवून दोघांना ताब्यात घेतले आहे.
विवेकानंद नगरातील एक घरात घुसून काही तरुणांनी गुंडागर्दी करीत पुरुषांना मारहाण केली तर महिलांबद्दल अपशब्द वापरले. त्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक केली. याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक किरण शिंदे घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी जमाव पांगवत दोघा तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. तर काही महिलांनी चक्क पोलिस निरिक्षक किरण शिंदे यांच्या पाया पडून कारवाईबद्दल आभार मानले.
पोलिसांना राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावे धमक्या
ताब्यात घेतलेल्या तरूणांनी पोलिस ठाण्यातही धिंगाणा घातला. पसार झालेल्यांचा शोध रात्री उशीरापर्यंत पोलिस घेत होते. तर मारहाण झालेल्यांची उशीरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते. ताब्यात घेतलेल्या तरूणांनी पोलिसांना राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नावे धमक्या दिल्या.