छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) घरासमोर पडलेली विद्युत केबल बाजूला करताना शॉक लागून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आयबा तांडा येथे गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. सतीश प्रभू पवार असे मृताचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, सतीश हा खाजगी वाहन चालक असून तो सायंकाळी घरासमोर बसला होता. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे विद्युत खांबाहून घरात येणारे सर्विस वायर तुटून खाली पडली. या वायरमुळे इतरांना शॉक लागू नये म्हणून सतीश वायर बाजूला करण्यासाठी गेला असता त्याला जबर शॉक लागला. बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार जहीर शेख करत आहेत. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.