धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील बेलदार मोहल्ल्याजवळ नवीन शौचालयाचे बांधकाम सुरु आहे. परंतू या शौचालयालागूनच उर्दू शाळा आहे. शौचालयातील अस्वच्छता, दुर्गंधीमुळे विद्यार्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे पालकांसह सामाजिक कार्यकर्ते, राजकीय लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे पालिका प्रशासनाला विनंती करूनही शौचालय स्थलांतरीत करण्यात आले नसल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणात आपण निसर्गप्रेम शिकवतो. पण हे केवळ तोंडी आणि पुस्तकातील चित्रांच्या आधारे रुजणारे मूल्य नाहीय. त्यासाठी त्याला निसर्गाचे सांनिध्य उपलब्ध करून द्यावे लागते. शिक्षकांना यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. तर त्याला तेवढीच ग्रामस्थांची साथ देखील लागते. शाळेचा परिसर नेहमी निसर्गरम्य आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असला पाहिजे. परंतू या उलट धरणगावात बेलदार मोहल्ल्याजवळ नवीन शौचालयाचे बांधकाम केले जातेय.
शाळेला लागून शौचालयात बांधल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्यांचे मन अभ्यासात कसे रमेल?, हा मोठा प्रश्न आहे. बरं काही सुज्ञ लोकांनी शौचालय स्थलांतरीत करण्याची विनंती पालिकेतील पदाधिकाऱ्यांना केली होती. परंतू त्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
दुसरी धक्कादायक बाब म्हणजे आधीच्या शौचालयाचे बांधकाम सुस्थितीत असतानाते पाडून नवीन शौचालय बांधले जात असल्यामुळे सध्या धरणगावातील सोशल मीडियात यावर मिश्कील टिप्पण्या सुरु आहेत. एकाच ठिकाणी ठराविक अंतराने तीन-चार वेळेस शौचालय का बांधले जातेय?, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. तर शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करताय.
शाळेचा परिसर स्वच्छ आणि आरोग्यवर्धक राहण्याच्या दृष्टीने शौचालय दुसरीकडे बांधले गेले पाहिजे होते. दुर्गंधी तथा इतर गोष्टी लक्षात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या. लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला काहीही माहिती नव्हती. अन्यथा आम्ही पालिकेला विनंती केली असती.
-शेख निजामोद्दीन हुसनोद्दिन, मुख्याध्यापक, उर्दू शाळा
हे खरं आहे की, आता बांधकाम सुरु झालेय. पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता, शौचालय दुसरीकडे बांधले गेले असते तर अधिक योग्य राहिले असते.
– अहमद पठाण, नगरसेवक धरणगाव
खरं म्हणजे शाळा बाजूला असतांना पालिका प्रशासनाने शौचालय बांधताना विचार केला पाहिजे होता. विद्यार्थ्यांना आरोग्यवर्धक आणि निसर्गरम्य शालेय परिसर देण्याचा प्रयत्न असतो. पण धरणगावात याउलट विनंती करून देखील मुद्दाम शाळेच्या बाजूला शौचालय बांधले जात आहे. माझा प्रश्न आहे, पालिकेचे पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेतील त्यांच्या ऑफिसच्या बाजूला असे शौचालय बांधले असते का?
– हाजी इब्राहीम शेख, मुस्लीम नेते तथा माजी नगरसेवक
या बांधकामा बाबत मी आधीच तक्रार केलेली आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी मुख्यधिकाऱ्यांना याबाबत अहवाल पाठविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. विद्यार्थीच काय, गावातील नागरिकांच्या आरोग्याशी देखील पालिकेतील पदाधिकार्यांना देणे घेणे नाहीय.
अॅड. संजय महाजन, जिल्हाध्यक्ष भाजप ओबीसी आघाडी, जळगाव
सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे असते. याठिकाणी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे होता. परंतू दुर्दैवाने तसे झालेले दिसत नाहीय.
कैलास माळी, विरोधीपक्ष नेते तथा शिक्षक