टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्णपदकाचा १२ वर्षांचा दुष्काळ समाप्त झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. नीरजने अंतिम फेरीत पहिला थ्रो ८७.०३ आणि दुसरा थ्रो ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरलं.
नीरजसह १२ स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८, तिसऱ्या प्रयत्नात ७६.९७, चौथा प्रयत्न फाऊल झाला.
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेक क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. तो आज पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. २३ वर्षीय नीरज चोप्राने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकला होता.
















